नव्या व्यावसायिक नाटकाबद्दल माहिती आली समोर




मराठी नाटकांचा मोठा चाहतावर्ग आहे. एखादा कलाकार कितीही मोठा झाला, कितीही राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवले, मसालापट ते चरित्रपटांपर्यंत आभाळाएवढ्या उंचीच्या व्यक्तिरेखा साकारल्या तरी रंगभूमीची ओढ कधीच संपत नाही. कोणताही हाडाचा कलाकार ठराविक वेळेनंतर पुन्हा तो रंगभूमीकडे वळतो, इथे होणाऱ्या तिसऱ्या घंटेसोबत व्यक्तिरेखेत शिरतो, प्रयोगांमागून प्रयोग करत त्यातच रमतो आणि जिवंत कला पाहण्याचा अनुभव रसिकांना देण्यासाठी मेहनत करतो. चतुरस्र अभिनेते सचिन खेडेकरही याला अपवाद नाहीत.

मराठीपासून हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा अमीट ठसा उमटवणारे सचिन खेडेकर तब्बल २१ वर्षांनी पुन्हा मराठी व्यावसायिक रंगभूमीकडे वळले आहेत. ‘गेट वेल SOON!’, ‘हॅम्लेट’, ‘हसवा फसवी’, ‘वाडा चिरेबंदी’, ‘मग्न तळ्याकाठी’, ‘युगान्त’, ‘संज्या छाया’, ‘हरवलेल्या पत्त्यांचा बंगला’, ‘चारचौघी’, ‘आज्जी बाई जोरात’ या मराठी व्यावसायिक रंगभूमी गाजवणाऱ्या दर्जेदार नाटकांची परंपरा जपणाऱ्या जिगिषा आणि अष्टविनायक या निर्मिती संस्थांनी पुन्हा एकदा नवीन नाट्यकृतीचे शिवधनुष्य उचलले आहे.