पणजी : राज्याचे वनमंत्री विश्वजित राणे यांनी गोव्यातील अकार्यक्षम वन अधिकाऱ्यांवर तीव्र शब्दांत टीका करत त्यांच्या कार्यप्रणालीवर नाराजी व्यक्त केली. काही अधिकाऱ्यांनी बोंडला प्राणीसंग्रहालयाला भेट न देणे आणि जखमी बिबट्याची काळजी घेण्यात असमर्थता दाखवणे, हे त्यांच्या अकार्यक्षमतेचे स्पष्ट उदाहरण असल्याचे राणे यांनी नमूद केले.मंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले की, अशा निष्क्रिय अधिकाऱ्यांना गोव्यात टिकवून ठेवण्याची गरज नाही. गोव्याचे हित आणि वन्यजीव संवर्धन हे सरकारचे प्राधान्य असून, या दिशेने सकारात्मक काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.राणे यांनी एपीसीसीएफ प्रवीण राघव आणि पीसीसीएफ यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत, त्यांचा सक्रिय दृष्टिकोन इतरांसाठी आदर्श असल्याचे सांगितले. वन्यजीव संवर्धनासाठी चरण देसाई यांच्यासह स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्याचेही त्यांनी संकेत दिले. त्यांनी पशुवैद्यकीय आणि वन्यजीव देखभालीसाठी अत्याधुनिक सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला असून, नुकत्याच मृत्युमुखी पडलेल्या ब्लॅक पँथरच्या डीएनए तपासणीचे उदाहरण देत संवर्धनाच्या गंभीरतेवर भर दिला. बिबट्याच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेशही त्यांनी दिले असून, वन्यजीव हॉटस्पॉट्समध्ये वेग मर्यादा घालण्याची सूचना दिली आहे.राणे यांनी ठामपणे सांगितले की, आपले कर्तव्य बजावण्यास अनिच्छुक असलेल्या अधिकाऱ्यांना गोवा सरकारमध्ये जागा नाही.