पणजी : मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील जीएमआर गोवा एअर कार्गोने मागील आठवड्यात आंबा निर्यातीच्या क्षेत्रात एक महत्त्वाचा टप्पा गाठला. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आलेल्या 3368 किलो ताज्या हापूस आंब्यांची हंगामातील पहिली खेप शारजाहला एअर अरेबिया या विमान सेवेद्वारे पाठवण्यात आली. ही निर्यात शिवकोकण फार्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड व श्रीवली अॅग्रो यांनी केली आहे.
हे पहिल्यांदाच घडले आहे की गोव्याहून स्थानिक आंब्यांची निर्यात युएईमध्ये झाली आहे. या टप्प्यामुळे जीएमआर गोवा एअर कार्गोने स्थानिक शेतकऱ्यांसाठी नवीन बाजारपेठेचा मार्ग उघडला आहे.
रत्नागिरी व देवगड हापूस आंब्यांना मध्यपूर्व व युरोपमधील बाजारात मोठी मागणी असून चांगला दर मिळतो. जीएमआर गोवा एअर कार्गोची टीम अशा तापमान-संवेदनशील मालाची योग्य काळजी घेत त्वरित वाहतूक सुनिश्चित करत आहे.
कोकणहून थेट शारजाह व दुबईसाठी आंबा निर्यातीचा यशस्वी प्रारंभ झाल्यामुळे, जीएमआर गोवा एअर कार्गोने ताज्या फळांसारख्या नाशिवंत वस्तू हाताळण्यात आपली तज्ज्ञता सिद्ध केली आहे. त्यामुळे गोव्याला परदेशात ताज्या उत्पादनांची निर्यात करण्यासाठी नवे संधीच्या दारं उघडली आहेत.
युरोपीय बाजारात हापूस आंब्याची मागणी लक्षणीय वाढल्यामुळे, यंदाच्या हंगामात सुमारे 600 टन आंब्यांची निर्यातयुरोप व मध्यपूर्वेतील बाजारांमध्ये जीओएक्स (GOX) मार्फत होणार असल्याची अपेक्षा आहे.