पणजी : ‘ऑपरेशन सिंदूर’ या भारतीय लष्कराच्या महत्त्वपूर्ण कारवाईबाबत अत्यंत स्पष्ट, आत्मविश्वासपूर्ण व अधिकृत माहिती देशासमोर मांडणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी या मूळ बडोदा (गुजरात) येथील असून, त्या बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील कोण्णूर गावातील कर्नल ताजुद्दीन बागेवाडी यांच्या पत्नी आहेत.
त्यामुळे या गौरवशाली क्षणी संपूर्ण बेळगाव जिल्ह्याला विशेषतः कोण्णूर गावाला आपल्या सुनेचा अभिमान वाटतो आहे.
सेवेतील समर्पण आणि देशप्रेमाचे उदाहरण
कर्नल सोफिया कुरेशी यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान देशाला आणि जगाला दहशतवाद्यांच्या अड्ड्यांचा नकाशा आणि लष्कराची रणनिती प्रभावीपणे समजावून सांगितली. लष्कराच्या या विशेष मोहिमेबाबत स्पष्टता, आत्मविश्वास आणि तांत्रिक जाण असलेल्या त्यांच्या सादरीकरणाने लष्कराच्या भूमिकेला ठोस पाठबळ मिळाले.
प्रेमविवाहातून निर्माण झालेले लष्करी बंधन
सोफिया यांनी २०१५ मध्ये भारतीय लष्करातील कर्नल ताजुद्दीन बागेवाडी यांच्याशी प्रेमविवाह केला. सध्या ताजुद्दीन झाशी येथे सेवेत कार्यरत असून, लष्करातील दोन्ही अधिकाऱ्यांचे योगदान देशसेवेसाठी आदर्शवत मानले जात आहे.
गर्वाचा क्षण – बेळगावकरांचा उत्स्फूर्त अभिमान
बेळगाव आणि गोकाक तालुक्यातील नागरिकांनी या अभिमानास्पद क्षणी कर्नल सोफिया कुरेशी आणि त्यांच्या कुटुंबीयांचे अभिनंदन केले आहे. एक सुसंस्कृत, सशक्त आणि सजग महिला अधिकारी म्हणून त्यांचे कार्य आज देशासाठी प्रेरणादायी ठरत आहे.