पणजी : गोमंतकीय मूळ असलेल्या लिओन रिबेलो आणि जेनेट मास्कारेन्हास यांची ऑस्ट्रेलियन संसदेसाठी खासदार म्हणून निवड झाली आहे. जेनेट मास्कारेन्हास यांनी दुसऱ्यांदा विजय मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली असून, लिओन रिबेलो हे पहिल्यांदाच खासदार म्हणून निवडून आले आहेत. एनआरआय आयुक्त नरेंद्र सावईकर यांनी या दोघांचेही अभिनंदन केले आहे.

जेनेट मास्कारेन्हास यांची निवड वेस्टर्न ऑस्ट्रेलियामधील स्वान मतदारसंघातून लेबर पक्षाच्या उमेदवार म्हणून झाली. त्या २०२२ मध्ये पहिल्यांदा निवडून आल्या होत्या. त्या या मतदारसंघातून निवडून येणाऱ्या पहिल्या महिला आणि पहिल्या गोमंतकीय वंशाच्या खासदार ठरल्या आहेत. त्यांचा जन्म १९८० साली झाला असून, त्यांचे पालक केनियातून स्थलांतर करून ऑस्ट्रेलियात आले होते. मात्र त्यांचे मूळ गाव गोव्यात आहे.
लिओन रिबेलो यांनी क्विन्सलँडमधील मॅकफर्सन मतदारसंघातून लिबरल नॅशनल पार्टीच्या तिकिटावर विजय मिळवला आहे. त्यांचा जन्म १९९५ मध्ये कॅनबेरामध्ये झाला. त्यांचे पालक वलेरियानो आणि लिडी हे गोव्यातील वेर्णा गावातून ऑस्ट्रेलियात स्थलांतरित झाले होते. अवघ्या ३० वर्षांच्या वयात खासदार बनलेले लिओन रिबेलो हे सध्या ऑस्ट्रेलियातील सर्वांत तरुण खासदार ठरले आहेत.