मुंबई – घरच्या मैदानावर खेळणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाला एका रंगतदार आणि अत्यंत चुरशीच्या सामन्यात गुजरात टायटन्सकडून पराभवाचा सामना करावा लागला. या विजयासह गुजरातने महत्त्वाचे दोन गुण मिळवत आयपीएलच्या गुणतालिकेत अव्वलस्थान पटकावले आहे.
पावसाच्या व्यत्ययामुळे सामन्याचे स्वरूप डकवर्थ-लुईस नियमानुसार बदलण्यात आले आणि गुजरात टायटन्सला १९ षटकांत १४७ धावांचे लक्ष मिळाले. अखेरच्या षटकात गुजरातला विजयासाठी १५ धावांची गरज होती. मुंबई इंडियन्सकडून गोलंदाजीसाठी दीपक चाहरला जबाबदारी देण्यात आली होती.
मात्र, शेवटच्या षटकात स्लो ओव्हर रेटचा फटका मुंबईला बसला. निर्धारित वेळेत षटके पूर्ण न केल्यामुळे केवळ पाच क्षेत्ररक्षकांना सर्कलच्या बाहेर ठेवण्याची परवानगी होती. त्यामुळे गुजरातसाठी धावा काढणे अधिक सोपे झाले. त्यातच दीपक चाहरने एक नो बॉल टाकून मुंबईच्या अडचणीत भर घातली.
सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर गुजरातला दोन धावांची गरज होती. चेंडू मैदानात खेळून फलंदाज धाव घेण्यासाठी धावले असता, एक धाव पूर्ण करून दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला. यावेळी हार्दिक पांड्याने थ्रो केला, परंतु थेट विकेटवर न लागल्याने रन आऊटची संधी हुकली आणि गुजरातने अंतिम चेंडूवर सामना जिंकला.
मुंबई इंडियन्सकडे सामना सुपर ओव्हरमध्ये नेण्याची नामी संधी होती, मात्र क्षेत्ररक्षणातील आणि गोलंदाजीत झालेल्या चुका त्यांना महागात पडल्या. यामुळे केवळ सामना नव्हे, तर दोन अमूल्य गुणही मुंबईच्या हातून निसटला