पणजी : श्री लईराई देवी जत्रेतील दुर्दैवी चेंगराचेंगरीत ज्या भक्तांचा मृत्यू झाला, त्यांच्यासाठी सरकारकडून ठोस मदत करण्यात आली आहे. मासेमारी खात्याचे मंत्री निलकंठ हळर्णकर यांच्या हस्ते प्रत्येकी १० लाख रुपयांचे धनादेश मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना सुपूर्त करण्यात आले.

या आर्थिक सहाय्यामुळे मृतांच्या कुटुंबीयांना काहीसा दिलासा मिळेल, अशी भावना व्यक्त करण्यात आली. मंत्री हळर्णकर यांनी यावेळी मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करत सांगितले की, राज्य सरकार या कठीण प्रसंगी पिडीत कुटुंबांसोबत खंबीरपणे उभे आहे.

शिरगाव येथे झालेल्या या दुर्घटनेने संपूर्ण राज्य हळहळून गेले असून, या घटनेच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेले हे साहाय्य सांत्वनपर आणि सामाजिक जबाबदारीचे प्रतीक मानले जात आहे.