पणजी : विशेष तपास पथक (SIT - लँड ग्रॅब प्रकरण) ने रायसन रॉड्रिग्स याला आसगाव गावातील सर्वेक्षण क्र. ७८/२ मधील जमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे बळकावल्याप्रकरणी अटक केली आहे.
या प्रकरणात पॉलिना जुलियाना दिनीझ, मरिआनो अँटोनियो टेलेस गोंसाल्वीस आणि ब्रांको रॉड्रिग्स (सर्व राहिवासी बामणवाडा, सिओलीम) हे देखील सहआरोपी असून, त्यांच्याविरुद्ध तपास सुरु आहे.
SIT च्या प्राथमिक तपासात संबंधित जमिनीच्या मालकी कागदपत्रांमध्ये फेरफार करून ती मालमत्ता हडप करण्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणात आणखी काही संशयित व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता वर्तवली जात असून SIT कडून सखोल चौकशी सुरू आहे.
भूमाफियांविरुद्ध सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत हा अटकेचा मोठा टप्पा मानला जात असून, भूमी बळकावण्याचे साखळी स्वरूप उघडकीस येण्याची शक्यता आहे.