पणजी ः सुनिता वेर्लेकर फाऊंडेशनतर्फे रमाकांत वेर्लेकर चॅम्पियन्स ट्रॉफी टी-२० क्रिकेटच्या पाचव्या पर्वाचे आयोजन २९ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता करण्यात आले आहे. डॉ. राजेंद्र प्रसाद मैदान, मडगाव क्रिकेट क्लब येथे एमसीएल सुपरस्टार्स - मडगाव क्रिकेट क्लब मेंबर्स लीग प्रीमियम आणि पीजीएमएल किंग्ज - पणजी जिमखाना मेंबर्स लीग प्रीमियम यांच्यात विद्युतझोतात या करंडकासाठी हा टी-२० सामना रंगणार आहे.
या चॅम्पियन्स ट्रॉफीचे हे पाचवे वर्ष असल्याने भारताचे माजी क्रिकेटपटू, २००७ मध्ये टी-२० विश्वचषक विजेता संघाचा माजी प्रशिक्षक, संयुक्त अरब अमिरातीचे प्रशिक्षक आणि माजी सलामीवीर फलंदाज आणि मुंबई रणजी संघाचे माजी प्रशिक्षक लालचंद राजपूत हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असतील, अशी माहिती सुनिता वेर्लेकर फाऊंडेशनचे विश्वस्त गौतम वेर्लेकर यांनी दिली.
मडगाव क्रिकेट क्लब आणि पणजी जिमखाना क्रिकेट क्लब या राज्यातील दोन आघाडीच्या क्लबांमधील हा सामना मौल्यवान असल्याचे वेर्लेकर यांनी सांगितले. या संघांमध्ये आपापल्या सदस्य लीगमधील सर्वोत्कृष्ट खेळाडूंचा समावेश असेल, असे सांगून मनोज काकुलो आणि योगेश नाईक यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांनी आभार मानले.
गोवा राज्यासाठी तयार केलेल्या खेळाडूंच्या बाबतीत या दोन्ही क्लाबंना मानाचे आणि महत्त्वाचे स्थान आहे. राज्यातील अव्वल दोन क्लबांना एकत्र आणण्याचा हा छोटासा प्रयत्न असून या क्लबचे सर्वोत्तम खेळाडू टी-२० सामन्यात एकमेकांशी भिडतात पाहण्याची संधी मिळणार आहे. यंदा दोन्ही क्लबांनी आपापले संघ निवडले असून हा सामना रोमांचक असेल, अशी आम्हाला आशा आहे.
सुनीता वेर्लेकर फाऊंडेशनचे मुख्य विश्वस्त किशोर कोडोलीकर म्हणाले की, दरवर्षी हा कार्यक्रम सादर करण्याचा फाउंडेशनचा प्रयत्न आहे.
गौतमचे वडील रमाकांत वेर्लेकर हे व्यवसायाने सीए होते आणि क्रिकेटचे मोठे शौकीन होते. १९७० च्या दशकात ते तिंबलो क्रिकेट संघाचे खेळाडू होते. त्यांचा वारसा पुढे नेण्यासाठी दरवर्षी ही ट्रॉफी आयोजित करावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो.
पणजी जिमखान्याच्या संचालन परिषदेचे अध्यक्ष सुरेश महादेवन म्हणाले, ’गोव्यातील क्रिकेटमध्ये हे दोन्ही क्लब आघाडीवर आहेत. राज्यातील सर्वोत्तम खेळाडूंना एकमेकांशी स्पर्धा करण्याची ही आणखी एक संधी आहे.
मडगाव क्रिकेट क्लबचे सचिव अपूर्व भेंब्रे म्हणाले, गोव्यातील या दोन्ही क्लबची स्वतःची मैदाने, पायाभूत सुविधा, संस्था आणि सदस्यसंख्या आहे. ते त्यांच्या सदस्यांच्या लीगदेखील आयोजित करतात. दोन्ही संघांमध्ये क्लबची सदस्यसंख्या मोठी असल्याने एकत्र येणार्या खेळाडूंसाठी ही संधी आहे, त्यामुळे हा मडगाव क्रिकेट क्लब विरुद्ध पणजी जिमखाना नाही. ही प्रतिभा आणि क्षमतांची स्पर्धा आहे. स्पर्धात्मक स्पर्धा पाहायला मिळेल, अशी आम्हाला आशा आहे.
वेर्लेकर म्हणाले की, फ्लडलाईट मॅचचे कारण उष्ण हवामान आहे. या सामन्यात रोलिंग रिप्लेसमेंट, चॅलेंज ओव्हर आणि फलंदाजांच्या धावांबाबतचे निर्बंध यासारखे काही अतिरिक्त बदल असतील, असेही ते म्हणाले.
नियमांमध्ये दोन जोडण्या आहेत - संघांना सामन्यादरम्यान ३ खेळाडूंची बदली करण्याची परवानगी आहे. आणि दुसरे म्हणजे ११ व्या ते १५ व्या षटकादरम्यान एक चॅलेंज ओव्हर असेल ज्यामध्ये फलंदाजी करणार्या संघाला आधी जाहीर केलेल्या टार्गेट रननुसार दुप्पट धावा करण्याची संधी असेल.
पीजीएमएल विजेत्या संघाचा कर्णधार मुख्तार काद्री यावेळी म्हणाला की, फ्लडलाइटखाली एमसीसी मैदानावर खेळण्यासाठी संघ उत्सुक आहे. एमसीएल स्टार्सचा कॅप्टन आदित्य आंगले म्हणाला, मी चार आवृत्त्या खेळलो आहे आणि ही एक शानदार वाटचाल असेल ज्यात सर्वोत्तम प्रतिभा असेल.