पणजी : गोवा विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्या २४ ते २६ मार्च दरम्यान होत असून २६ मार्च रोजी दुपारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत अर्थमंत्री या नात्याने राज्याचा २०२५-२६ चा अर्थसंकल्प सादर करतील. यासाठी सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी जय्यत तयारी केली आहे
या तीन दिवसांच्या अधिवेशनाची सुरुवात प्रश्नोत्तरांच्या तासाने होईल. त्यानंतर शून्यकाळ, लक्षवेधी याबरोबरच राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई यांच्या भाषणावर चर्चा होईल. या अधिवेशनासाठी विविध विधानसभा सदस्यांकडून १८० तारांकित तर ५४८ तथारांकित प्रश्न विचारण्यात आले आहेत. विधानसभा कामकाजाच्या दरम्यान या प्रश्नांवर ही चर्चा होण्याची शक्यता आहे. विरोधकांनी मात्र कामकाज अत्यंत कमी असल्याने नाराजी व्यक्त केली आहे. अधिवेशन केवळ तीन दिवसाचे असले तरी विरोधकांकडून जयत तयारी करण्यात आली आहे या दरम्यानच्या काळात राज्यातील विविध घोटाळे, सरकारच्या कामकाजातील अनियमित्ता यावर बोट ठेवून विरोधक आक्रमक पद्धतीने कामकाजात सहभागी होणार असल्याचे समजते. अर्थात सत्ताधाऱ्यांकडूनही विरोधकांच्या प्रश्नांना चोख उत्तर देण्याची तयारी चालू केलेली आहे.