पणजी : राज्य सरकारने अयोध्येत 'गोवा राम निवास' बांधण्यासाठी एक भूखंड संपादित केला असून श्री रामलला दर्शनासाठी गोव्यातील राम भक्तांसाठी सोय होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री डॉ. सावंत पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली, अयोध्येत भव्य श्री राम मंदिराचे स्वप्न प्रत्यक्षात आले आहे, ज्यामुळे आपला आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा पुन्हा जागृत झाला असून या ऐतिहासिक चळवळीशी जुळवून घेत, गोवा राम निवास उभारण्यात येणार आहे. अयोध्येला येणाऱ्या भाविकांसाठी एक पवित्र आणि खात्रीशीर निवासस्थान प्रदान करेल. यासाठी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेश आवास एवम विकास परिषद, उत्तर प्रदेश सरकार यांनी या उपक्रमाला चालना देण्यासाठी सढळ पाठिंब्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. परशुरामभूमी गोवा आणि अयोध्या यांच्यातील आध्यात्मिक बंध मजबूत करण्यासाठी, संपूर्ण भारतात भक्ती, संस्कृती आणि एकता वाढवण्यासाठी हे आणखी एक पाऊल आहे. असेही ते म्हणाले.