पणजी : वाढदिवसाच्या दिवशी साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी शिर्डीला जात असलेल्या युवकावर कंटेनर कोसळून झालेल्या भीषण अपघातात त्याचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेत भगवान उत्तम कासकर (वय — न्हयबाग, पोरस्कडे) याने आपला जीव गमावला. ही घटना शनिवारी रात्री महाराष्ट्रातील सातारा येथे घडली.
वाढदिवसाआधीच काळाने हिरावलं
भगवान यांचा वाढदिवस रविवारी, २० एप्रिल रोजी होता. यानिमित्त त्यांनी आपल्या तीन मित्रांसह शिर्डीला जाण्याचा निर्णय घेतला होता. प्रवासादरम्यान ते साताऱ्यात एका हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबले, आणि त्याठिकाणी वाढदिवसाचा केकही कापण्यात आला.
भीषण अपघाताची क्षणचित्रे
रात्री साडेअकरा वाजता, जेवण करून ते चारही मित्र पार्क केलेल्या वाहनाकडे जात असताना, सुसाट वेगात आलेल्या कंटेनरने प्रथम वीज खांबाला धडक दिली, आणि खांबासकट कंटेनर उलटला. त्यावेळी ते चौघे चालत होते. तिघे मित्र थोडक्यात बचावले, मात्र भगवान पळत असतानाच कंटेनर थेट त्याच्यावर कोसळला आणि तो जागीच ठार झाला.
पोरस्कडे परिसरात हळहळ
या घटनेनंतर पोरस्कडे न्हयबाग परिसरात शोककळा पसरली आहे. भगवान कासकर हा रेती व्यवसायात कार्यरत होता. चार बहिणींचा लाडका भाऊ आणि कुटुंबाचा एकुलता मुलगा असलेला भगवान हे कुटुंबाचे कणा होते. त्यांच्या निधनाने संपूर्ण कुटुंब उघड्यावर आले असून, परिसरात दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सातारा पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला असून, अधिक तपास सुरू आहे.
— गोमंतभूमी न्यूज