पणजी भोम गावाभोवती बायपास करणे शक्य नाही, कारण ती जमीन खाजन आहे, भोम गावातील प्रस्तावित बायपास रस्त्यावर सध्या सुरु असलेल्या वादावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्टता दिली आहे. 

मुख्यमंत्री म्हणाले, या बायपास रस्त्यामुळे चार घरे पाडली जातील मात्र त्या घरांच्या मालकांना पर्यायी जमीन आणि योग्य भरपाई निधी दिला जाईल. येथील मंदिराला कोणताही धोका नाही, मंदिर अबाधित राहील, असेही त्यांनी सांगितले.
याप्रकरणी गावकऱ्यांमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता लक्षात घेता मुख्यमंत्री म्हणाले, भोमच्या ग्रामस्थांना कोणीतरी दिशाभूल केली आहे. सविस्तर आराखडा मी ग्रामस्थांसमोर ठेवला असून, त्यांच्या शंका मिटवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.
गावकरी बायपासवर ठाम
भोम गावातील रहिवाशांनी प्रस्तावित रस्त्याच्या विस्तारीकरणाच्या पार्श्वभूमीवर आज मंत्रालयात आयोजित बैठकीत भाग घेतला. मात्र ते आपल्या बायपास मागणीवर ठाम आहेत. विस्तारीकरणाच्या ऐवजी स्वतंत्र बायपास रस्ता निर्माण करण्यावर त्यांनी भर दिला. रहिवाशांनी सांगितले की, विस्तारीकरणामुळे अनेक घरे आणि धार्मिक स्थळांना धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन प्रस्तावित मार्ग स्पष्ट करावा अशी मागणी केली आहे.
सरकारने या संपूर्ण प्रकरणात पारदर्शकता ठेवावी आणि लोकांचा विश्वास संपादन करावा, असे स्थानिकांनी सांगितले. यासोबतच ग्रामस्थांनी रस्त्याच्या संपूर्ण आराखड्याची माहिती दिली जावी, अशी मागणीही पुढे केली आहे.