पणजी : जम्मू कश्मीर मध्ये काल मंगळवारी झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याचा निषेध करत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्या आज गुरुवारी होत असलेल्या वाढदिवसाचे सर्व कार्यक्रम रद्द करून केवळ सेवा कार्यक्रम करणार असल्याचे जाहीर केले आहे. दरम्यान जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेले सर्व २६ गोवेकर सुरक्षित असून त्यांच्याशी प्रशासनाच्या वतीने संपर्क करण्यात आलेला आहे. ज्या ठिकाणी हा हल्ला झाला त्या ठिकाणी गोव्यातील तीन जोडपी उपस्थित होते. मात्र ते या हल्ल्यापूर्वी केवळ १५ मिनिटाअगोदर त्या परिसरातून बाहेर पडल्याने सुदैवाने ते वाचले असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी आज दिली. मंत्रिमंडळ बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

 डॉ. सावंत पुढे म्हणाले, हा हल्ला अत्यंत भ्याड असून धर्म आणि जात विचारून केलेला हा देशातील पहिलाच हल्ला असावा, या हल्लेखोरांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकार कठोर कारवाई करेलच या हल्ल्यात जखमी झालेल्यांना झालेले नागरिक लवकरात लवकर बरे होवोत, हीच प्रार्थना. या हल्ल्याचा निषेध करत मुख्यमंत्र्यांनी आज २४ एप्रिल रोजी होत असलेले आपल्या वाढदिवसाचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. याशिवाय वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारल्या जाणार नाहीत अशी माहितीही त्यांनी दिली आहे. या वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी सेवा कार्यक्रम आयोजित केले आहेत, ते कार्यक्रम मात्र नियोजित वेळेप्रमाणे होतील असेही ते म्हणाले. यात रक्तदान शिबिर, वैद्यकीय शिबिर अशा स्वरूपाचे सेवाभावी कार्यक्रमांचा समावेश आहे.

राज्यात सुरक्षा व्यवस्था कडक

गोवा हे आंतरराष्ट्रीय किनारी पर्यटन स्थळ असल्याने राज्यात देश विदेशातून आलेल्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गृह खात्याला अलर्ट करत सर्वत्र कडक बंदोबस्त लावला आहे. यात पर्यटन स्थळ, मुख्य बसस्थानके, रेल्वे स्थानके, विमानतळ यांचा समावेश आहे. याशिवाय मुख्य रस्त्यांवर ही तपासणी सुरू केली आहे.