नवी दिल्ली -  जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात आतापर्यंत २८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १४ जण जखमी झाले आहेत. पहलगाममध्ये पोलिसांच्या गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी देशीविदेशी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी पन्नासहून अधिक गोळ्यांची फैर झाडली. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घटनास्थळ बैसरन व्हॅलीची पाहणी करण्यात आली. पहलगाम येथे नेमकी घटना कशी घडली, याबाबत अमित शाह यांनी माहिती घेतली. जम्मू काश्मीरचे नायब राज्यपालही यावेळी शाहांसोबत उपस्थित होते. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर दुपारी अमित शाह दिल्लीकडे रवाना होणार आहेत. यानंतर दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेटही घेणार आहेत. दिल्लीत एक महत्वाची बैठक घेण्यात असून यावेळी भारताचे पुढचे पाऊल काय असेल ? कोणती कारवाई करण्यात येणार यावर बैठकीत चर्चा होईल. 
अमित शाह यांनी घटनास्थळी पोहचण्याआधी जम्मू काश्मीर पोलीस कंट्रोल रूममधे मृतकांच्या पार्थिवाचे अंतिमदर्शन घेतले. अमित शाह यांनी यावेळी मृतांच्या परिवाराचं सांत्वन केले. यानंतर अमित शाह यांनी ट्विट करत दहशतवाद्यांना इशारा दिला आहे. अमित शाह यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहिली. तसेच भारत दहशतवाद्यांसमोर झुकणार नाही, असे अमित शाह म्हणाले. तसेच या भ्याड दहशतवादी हल्ल्यातील गुन्हेगारांना सोडले जाणार नाही, असा इशारा देखील अमित शाह यांनी दिला. जम्मू-काश्मीर सरकारकडून मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाख - 

जम्मू-काश्मीर सरकारकडून मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाखांची
मदत जाहीर केली आहे.
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरला आहे. या हल्ल्यात अनेक निरपराध नागरिकांचा बळी गेला असून, अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेची तीव्र निंदा करत जम्मू-काश्मीर सरकारने मृतांच्या कुटुंबीयांसाठी १० लाख रुपये, गंभीर जखमींसाठी  २ लाख रुपये आणि किरकोळ जखमींसाठी १ लाख रुपयांची आर्थिक मदत  जाहीर केली आहे.