पणजी : राज्यातील समुद्रकिनारी आणि सागरी हद्दीत बेकायदेशीर मासेमारी आणि एलईडी लाइटच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रोनच्या सहाय्याने पायलट प्रकल्प राबविण्यात येत आहे, अशी माहिती मत्स्यव्यवसाय मंत्री निळकंठ हळर्णकार यांनी दिली आहे.

नव्याने तंत्रज्ञानाचा वापर

ड्रोनच्या माध्यमातून सागरी हद्दीत पाळत ठेवून ज्या बोटी बेकायदेशीर मासेमारी करत आहेत, विशेषत एलईडी लाइटचा वापर करून मासे आकर्षित करत आहेत, त्यांची नोंद घेतली जात आहे. पायलट प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर त्याचे प्रमाण वाढवून राज्यभर त्याचा विस्तार केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कारवाई आणि दंडात्मक प्रक्रिया

हळर्णकार म्हणाले, ड्रोनद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे संबंधित बोटींच्या विरोधात कारवाई केली जाईल. सध्या काही मासेमारी करणाऱ्या बोटी नियम धाब्यावर बसवून एलईडी लाइट्सचा वापर करत असल्याचे आढळले आहे. हे मासेमारी कायद्याचे उल्लंघन आहे. यावर कठोर पावले उचलली जातील.

मत्स्यव्यवसाय विभागाची सतर्कता

मत्स्यव्यवसाय विभागाच्या पथकांकडून नियमित गस्तीद्वारे समुद्रात लक्ष ठेवले जात असले तरी ड्रोनमुळे अधिक अचूक आणि दूरस्थ भागांतील हालचालींची माहिती मिळत आहे. त्यामुळे एलईडी मासेमारी, परराज्यांच्या बोटींचा प्रवेश यावर प्रभावी नियंत्रण ठेवता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मत्स्य व्यावसायिकांचा सहभाग आवश्यक

मंत्री हळर्णकार यांनी स्थानिक मच्छीमार समुदायालाही आवाहन केले की, त्यांनी अशा बेकायदेशीर कृत्यांबाबत विभागाशी संपर्क साधावा आणि सहकार्य करावे. स्थानिक मच्छीमारांची माहिती, ड्रोनमधून मिळालेला डेटा आणि विभागाची कृती यामुळे ही समस्या कमी करता येईल,असेही त्यांनी स्पष्ट केले.