पणजी | शिरगाव येथे , २ मे रोजी पार पडणाऱ्या वार्षिक श्री देवी लइराई जत्रेसाठी उत्तर गोवा पोलिसांनी विशेष सुरक्षा उपाययोजना राबवत दोन ड्रोन तैनात केले. उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ही हवाई देखरेख महत्त्वाची ठरणार असल्याचे उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक अक्षत कौशल यांनी सांगितले.
उत्सवापूर्वी सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी डीवायएसपी (म्हापसा) जीवबा दळवी आणि पोलिस निरीक्षक दिनेश गाडेकर यांनी घटनास्थळाला भेट दिली. मोठ्या संख्येने भक्तगण उपस्थित राहण्याची शक्यता लक्षात घेता, कोणतीही अडचण उद्भवू नये यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.
ड्रोनच्या सहाय्याने उत्सवस्थळी सातत्याने देखरेख ठेवण्यात आली असून, पोलिसांचा बंदोबस्त, वाहतूक नियंत्रण व गर्दी व्यवस्थापन यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवण्यात आल्या.उत्सव शांततेत पार पाडण्याकरिता पोलीस प्रशासन सतर्क असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.