पणजी : जगभरातील ख्रिस्ती समाजासाठी अत्यंत महत्त्वाच्या समारंभात पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यसंस्कारासाठी भारताकडून एक प्रतिष्ठित शिष्टमंडळ व्हॅटिकन सिटीकडे रवाना झाले आहे. या शिष्टमंडळाचे नेतृत्व राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू करत असून त्यांच्यासोबत केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजूकेंद्रीय राज्यमंत्री जॉर्ज कुरियनआणि गोवा विधानसभेचे उपसभापती तसेच म्हापसाचे आमदार जोशुआ पीटर डिसोझा*यांचा समावेश आहे.
या शिष्टमंडळाची निवड हा भारतातील विविधतेचा आणि धार्मिक सहिष्णुतेचा सन्मान करणारा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. पोप फ्रान्सिस यांचे नेतृत्व हे सामाजिक न्याय, समतेच्या मूल्यांना समर्पित होते. त्यांच्या स्मृतीस मानवंदना देण्यासाठी जगभरातील अनेक राष्ट्रप्रमुख, धर्मगुरू आणि मान्यवर व्यक्ती व्हॅटिकन सिटीत एकत्र येणार आहेत.
जोशुआ डिसोझा यांचे या शिष्टमंडळात समावेश होणे हे गोव्यासाठी अत्यंत सन्मानाची बाबअसून, राज्यातल्या ख्रिस्ती समाजाचे प्रतिनिधित्व राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर होण्याचा एक विशेष क्षण ठरतो.
हा ऐतिहासिक आणि भावनिक क्षण भारताच्या वतीने जागतिक पातळीवर श्रद्धांजली अर्पण करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. शिष्टमंडळाकडून पोप फ्रान्सिस यांच्या योगदानाचा गौरव करत त्यांच्याविषयी आदर व्यक्त करण्यात येणार आहे.