पणजी : गोव्यातील तीन पाकिस्तानी नागरिकांना तात्काळ देश सोडण्याचे आदेश देण्यात आले असून, व्हिसाच्या मुदतीनंतरही भारतात थांबलेल्या १७ पाकिस्तानी नागरिकांवर पोलिस यंत्रणेकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी एका उच्चस्तरीय सुरक्षा बैठकीनंतर दिली.
राज्यभरात सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर शनिवारपासून व्यापक कोंबींग ऑपरेशन राबवले जाणार असून, पर्यटन स्थळे, सार्वजनिक गर्दीची ठिकाणे, बाजारपेठा, आणि इतर संवेदनशील भागांमध्ये पोलिस फोर्सची अतिरिक्त तैनाती करण्यात आली आहे. नाकाबंदी आणि चौकशी मोहिमा जोरात राबवण्यात येणार आहेत.
रेल्वे स्टेशन आणि गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळावर कडक सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली आहे.राज्य पोलिस दलासह केंद्रीय सुरक्षा यंत्रणाही सज्ज असून, कोणतीही शंका वाटल्यास नागरिकांनी त्वरित पोलिसांना कळवावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी राज्यातील पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. गोवा हे एक पर्यटनप्रधान राज्य असून, कोणतीही सुरक्षेची झोल सहन केला जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही यावेळी देण्यात आला.