नवी दिल्ली : जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानशी संबंधित सर्व व्हिसा रद्द करण्यात आलेले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीनंतर गृहमंत्र्यांनी हा निर्णय घेतला.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकार अक्शन मोडवर आहे. भारताने मोठं पाऊल उचलत भारत-पाकिस्तान या दोन देशांमधला सिंधू करार स्थगित केला आहे. भारताने पाकिस्तानला औपचारिक पत्र पाठवत सिंधू पाणी करार स्थगित केल्याची माहिती दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या सुरक्षा समितीच्या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांच्या आत देश सोडावा लागणार आहे. जे लोक भारतातून जाणार नाहीत, त्यांना पकडून पाकिस्तानात पाठवलं जाणार आहे. स्थानिक पोलिसांना तशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.