पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त गोवा क्रिकेट असोसिएशनने अभिनव आणि कौतुकास्पद उपक्रम जाहीर केला आहे. या उपक्रमाअंतर्गत गोव्यातील सर्व शाळा आणि उच्च माध्यमिक संस्थांना मोफत क्रिकेट किट बॅग्ज वितरित करण्यात येणार असल्याची माहिती गोवा क्रिकेट असोसिएशनचे सचिव शांभा देसाई यांनी दिली.
या निर्णयामुळे राज्यातील क्रिकेटप्रेमी विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे साहित्य मिळेल, तसेच खेळाच्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध होतील.
बीसीसीआयचे संयुक्त सचिव रोहन गावस देसाई यांनीही या उपक्रमाचे स्वागत करत, गोवा क्रिकेट असोसिएशनचे सचिव शांभा देसाई, कोषाध्यक्ष दया पागी आणि संपूर्ण व्यवस्थापन समितीचे अभिनंदन केले. त्यांनी याला एक प्रेरणादायक पाऊल म्हणून संबोधले आणि सांगितले की, यामुळे राज्यातल्या ग्रामीण आणि निमशहरी भागातील विद्यार्थ्यांना क्रिकेटमध्ये आपली गुणवत्ता दाखवण्याची संधी मिळेल. गोवा क्रिकेट असोसिएशनने हा उपक्रम केवळ वाढदिवसाच्या निमित्ताने नव्हे तर राज्यातील क्रिकेट संस्कृती मजबूत करण्याच्या उद्देशाने राबवला आहे. या किट बॅगमध्ये क्रिकेट बॅट, बॉल, पॅड्स, ग्लोव्हज् आणि इतर आवश्यक वस्तूंचा समावेश असेल.