पणजी : राज्यात विधानसभा निवडणुकीला दीड दोन वर्षांचा बाकी असताना गोव्यात नव्या राजकीय घडामोडींना वेग येताना दिसत आहे. ‘गोय गोयकारपण’ या नावाचा नवा राजकीय पक्ष उदयास येणार असल्याची चर्चा आहे. या पक्षाच्या स्थापनेबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली, तरी राजकीय वर्तुळात याविषयी चर्चा सुरु झाली आहे. दक्षिण गोवा मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या या राजकीय पक्षांमध्ये माजी आमदारांचा भरणा असेल असे दिसते.

गोव्याच्या राजकीय आघाड्यांवर अनेक वर्षे सक्रीय असलेले, मात्र सध्या राजकारणापासून दूर गेलेले नेते या नव्या व्यासपीठावरून पुन्हा राजकारणात सक्रीय होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. राज्याच्या राजकीय समीकरणांवर या पक्षाचा संभाव्य प्रभाव काय असेल, हे सध्या चर्चेचा विषय बनला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस यांना या नव्या पक्षामुळे फायदा होणार की तोटा, हे येणारा काळच ठरवेल. विशेषतः मतांचे विभाजन हे या नव्या पक्षाच्या उदयामुळे होऊ शकते, आणि त्यामुळे पारंपरिक पक्षांना रणनीतीत बदल करावा लागू शकतो.
गोय गोयकारपण’ या नावातच स्थानिकतेचा आणि गोमंतकीय अस्मितेचा सुगंध आहे, त्यामुळे स्थानिक मतदारांमध्ये या पक्षाला आकर्षण मिळू शकते. आता हा पक्ष केवळ चर्चा पुरता मर्यादित राहतो की खरोखरच राजकीय वास्तवात उतरतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.