पणजी : दुबई येथे सुरू असलेल्या ‘अरबियन ट्रॅव्हल मार्केट (एटीएम) २०२५’ या आंतरराष्ट्रीय पर्यटन मेळाव्यात गोवा पॅव्हेलियनचे उद्घाटन भारताचे केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते करण्यात आले. या भव्य उद्घाटनप्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते.

दुबईतील भारताचे कॉन्सुल जनरल सतीश कुमार शिवन, गोव्याचे पर्यटन मंत्री रोहन खवंटे, आमदार सावर्डे, गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष गणेश गावकर, व्यवस्थापकीय संचालक कुलदीप आरोलकर, तसेच पर्यटन मंत्र्यांचे ओएसडी शॉन मेंडेस, गोव्यातील सह-प्रदर्शक आणि विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित पाहुणे या वेळी उपस्थित होते.

गोवा पॅव्हेलियनमध्ये राज्यातील समृद्ध सांस्कृतिक वारसा, समुद्रकिनारे, धार्मिक स्थळे, साहसी पर्यटन संधी आणि स्थानिक पाककृती यांचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले आहे. या मंचाद्वारे गोवा पर्यटन विभागाने जागतिक बाजारपेठेत गोव्याला एक अनोखे आणि बहुआयामी पर्यटन गंतव्य म्हणून सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. पर्यटन मंत्री रोहन खवंटे यांनी सांगितले की, हे व्यासपीठ गोव्याच्या पर्यटन संधींचा जागतिक पातळीवर प्रचार करण्यासाठी एक उत्तम संधी आहे. आम्ही अधिकाधिक पर्यटकांना गोव्याकडे आकर्षित करण्यासाठी नव्या योजना राबवत आहोत.
या पॅव्हेलियनद्वारे गोव्याचे पर्यटन क्षेत्र जागतिक गुंतवणूकदार, ट्रॅव्हल एजंट्स आणि उद्योगतज्ज्ञांसमोर आणखी दृढपणे मांडले जात आहे.