भोम रस्ता : ग्रामस्थांनी मुख्यमंत्री सावंत यांची घेतली भेट
पणजी : भोम रस्त्याच्या विस्तारीकरणावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर भोमा गावातील ग्रामस्थांनी साखळी येथे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली. या बैठकीत ग्रामस्थांनी त्यांच्या चिंता मांडल्या. यावर मुख्यमंत्र्यांनी मंदिराचा एकही भाग पाडला जाणार नाही, एकही घर हटवले जाणार नाही, असे आश्वासन दिले आहे.
याबाबत बोलताना डॉ. सावंत म्हणाले, जर एखाद्या घरावर परिणाम होत असेल तर मला दाखवा, आम्ही आराखडा बदलण्यास तयार आहेत. याबाबत सोमवारी मंत्रालयात तांत्रिक टीमसह ग्रामस्थांना बोलावून आराखडा दाखविण्यात येईल आणि त्यानुसार निर्णय घेतला जाईल. रस्त्याच्या विकासासाठी सरकार वचनबद्ध असले तरी स्थानिकांची धार्मिक व वैयक्तिक भावना जपूनच काम केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सोमवारच्या बैठकीकडे लक्ष
आज मुख्यमंत्री डॉक्टर सावंत यांनी स्थानिक नागरिकांना भेटून दिलासा देणारे आश्वासन दिल्याने ही भेट ग्रामस्थांसाठी दिलासा देणारी ठरली आहे, आता सोमवारी होणाऱ्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.