काणकोण : येथील चावडी भागात अज्ञात व्यक्तींनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी रस्त्यावर पाकिस्तानी झेंडा रंगवल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. एक झेंडा शिवाजी महाराज पुतळ्याजवळ, तर दुसरा चावडी–पानसुळे जंक्शन रस्त्यावर आढळून आला. या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या कृतीचा तीव्र निषेध केला आहे. ही घटना समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या हेतूने घडवण्यात आली असून, जबाबदार व्यक्तींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली जात आहे.
पोलिसांनी घटनास्थळी तातडीने भेट देत झेंडा पुसून टाकण्याची कारवाई केली असून, परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात आहेत. प्राथमिक अंदाजानुसार हा प्रकार मध्यरात्रीनंतर घडला असावा. संबंधित प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, लवकरच आरोपींना अटक केली जाईल, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.
या घटनेनंतर चावडी व आसपासच्या परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे. स्थानिक प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
“शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ असा प्रकार होणे ही अत्यंत निंदनीय बाब आहे. दोषींना तत्काळ अटक करावी,” अशी प्रतिक्रिया स्थानिक ग्रामस्थांनी दिली. अनेकांनी या घटनेच्या निषेधार्थ सोशल मीडियावरून आवाज उठवला आहे.