पणजी, : गोवा हे देशातील एक प्रमुख पर्यटनस्थळ असले तरी सध्याच्या आर्थिक परिस्थितीचा पर्यटनावर परिणाम होत असल्याचे स्पष्ट करत राज्याचे वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी राज्यातील वाढत्या दरांवर चिंता व्यक्त केली आहे.
“गोव्यात आता प्रत्येक गोष्टीचे दर प्रचंड वाढले आहेत – मग ते हॉटेलांचे भाडे असो, खाद्यपदार्थांचे दर असो वा प्रवासाचा खर्च. त्यामुळे पर्यटक दुसऱ्या राज्यांत किंवा परदेशात पर्याय शोधत आहेत,” असे गुदिन्हो म्हणाले.
त्यांच्या म्हणण्यानुसार, महागाईमुळे गोव्याच्या पर्यटन क्षेत्राला फटका बसत असून पर्यटकांची संख्या कमी होत आहे.गेल्या काही महिन्यांपासून गोव्यात येणाऱ्या पर्यटकांमध्ये घसरण झाली असून, याचे मुख्य कारण आर्थिक अडथळे व वाढलेले खर्च असल्याचे ते म्हणाले.
गुदिन्हो यांनी हॉटेल व्यावसायिक, टॅक्सी सेवा पुरवठादार आणि पर्यटनाशी संबंधित इतर घटकांना दर नियंत्रित ठेवण्याचे आवाहन*केले. “आपण जर पर्यटकांना योग्य दरात दर्जेदार सेवा देऊ शकलो नाही, तर गोव्यातील पर्यटन उद्योग अडचणीत येईल,” असा इशाराही त्यांनी दिला.
राज्य सरकारकडून लवकरच धोरणात्मक पावले उचलण्यात येणार असूनपर्यटनाशी संबंधित सेवांमध्ये पारदर्शकता आणि नियंत्रित दर ठेवण्याबाबत नवे मार्गदर्शक धोरण जाहीर होण्याची शक्यता आहे.
पर्यटन विभागानेही पर्यटकांचा ओघ कायम ठेवण्यासाठी नव्या योजना, आकर्षण स्थळांचा विकास, आणि आंतरराष्ट्रीय प्रमोशनवर भर देण्याचे संकेत दिले आहेत.