पणजी : नेरुळ येथील प्रसिद्ध कोको बीच परिसरात शुक्रवारी रात्री भीषण आग लागली. या आगीत किनाऱ्यावर लंगर टाकून ठेवलेल्या सात बोटी पूर्णतः जळून खाक झाल्या. घटनास्थळी अग्निशमन दलाने तातडीने धाव घेतली असली तरी आगीने काहीच वेळात जोर धरल्याने मोठे नुकसान झाले आहे.
या दुर्घटनेमुळे स्थानिक मच्छीमार आणि बोटमालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अनेकांनी ही आग नैसर्गिक नसून पूर्वनियोजित असल्याचा आरोप*केला आहे. स्थानिक नागरिकांनी सांगितले की, “या भागात यापूर्वीही अशा पद्धतीने बोटींना आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. प्रशासनाने गांभीर्याने चौकशी करावी.”
आगीत झालेल्या नुकसानीचे अद्याप अधिकृत मूल्यांकन झाले नसले तरी अंदाजे लाखोंचा तोटा* झाल्याचे प्राथमिक माहितीवरून समजते. बोटींमध्ये काही प्रवासी जलपर्यटन बोटीसुद्धा असल्याने या घटनेचा पर्यटनावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
*lनेरुळ पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि अग्निशमन अधिकारी घटनास्थळी हजर असून, आगीच्या कारणांचा तपास सुरू आहे. आग नेमकी कशी लागली, कोणत्याही बोटीत ज्वलनशील पदार्थ होते का, याची चौकशी करण्यात येत आहे.
दरम्यान, स्थानिकांनी प्रशासनाकडे सुरक्षा उपाययोजना वाढवण्याची मागणी केली आहे. “किनाऱ्यावर सीसीटीव्ही नसणे, बोटींसाठी योग्य जागा उपलब्ध न करणे, आणि रात्रीच्या वेळेस सुरक्षेचा अभाव ही गंभीर बाब आहे,” असे एका बोटमालकाने सांगितले.
गोवा सरकार आणि बंदर खात्याकडून यासंदर्भात लवकरच स्पष्टीकरण देण्याची शक्यताअसून, जळून खाक झालेल्या बोटमालकांना काही प्रकारचा आर्थिक दिलासा दिला जाईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.