पणजी,: शिरगांव येथे दरवर्षी पार पडणाऱ्या श्री देवी लइराई जत्रा उत्सव यंदा दुर्दैवी ठरला. भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे निर्माण झालेल्या चेंगराचेंगरीत सहा भाविकांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर गोमेकॉ (GMC) आणि अझीलो (Asilo) रुग्णालयांमध्ये तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत.
ही घटना जत्रेच्या मुख्य विधीच्या दरम्यान घडली. पहाटेच्या सुमारास हजारो भाविक लइराई देवीच्या दर्शनासाठी एकत्र आल्याने एकच गोंधळ उडाला आणि त्यातून चेंगराचेंगरी झाली. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, "क्षणात गर्दी बेशिस्त झाली आणि अनेकजण खाली पडले. त्यांच्यावर चुकून पाय पडले आणि प्राण गेले."
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रुग्णालयाला भेट देऊन जखमींची विचारपूस केली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच त्यांनी प्रशासनाला तत्काळ चौकशीचे आदेशदिले आहेत. "ही अतिशय दुर्दैवी घटना असून यापुढे अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी काटेकोर नियोजन गरजेचे आहे," असे मुख्यमंत्री म्हणाले.
स्थानिक आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये आमदार प्रेमेंद्र शेट, यांनीही रुग्णालयात भेट देऊन जखमी व त्यांच्या नातेवाइकांची विचारपूस केली. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आरोग्य विभागाने नाकारलेली नाही.
पोलीस आणि आपत्कालीन सेवांनी घटनास्थळी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.मात्र, सुरक्षेच्या दृष्टीने करण्यात आलेली पूर्वतयारी पुरेशी होती का, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
राज्यभरातून हळहळ व्यक्त केली जात असून, सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना तातडीचा आर्थिक दिलासा जाहीर करण्याची मागणी होत आहे.