लैंगिक अत्याचारानंतर अमानुष मारहाण करून घेतला जीव; सलीम डम्बल अटकेत



मडगाव (प्रतिनिधी):
मायणा-कुडतरी येथे घडलेल्या एका अमानुष घटनेने संपूर्ण गोवा हादरला आहे. केवळ पाणी प्यायला दिलं नाही म्हणून एका नराधमाने आपल्या सहा वर्षांच्या सावत्र मुलीला जबर मारहाण करत तिचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मायणा-कुडतरी पोलिसांनी गदग (कर्नाटक) येथील सलीम डम्बल (२८) याला अटक केली असून, वैद्यकीय अहवालातून त्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचेही स्पष्ट झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयिताने मुलीला विवस्त्र करून आपल्या समोर नाचण्यास भाग पाडले, त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि त्यानंतर अमानुष मारहाण करून तिचा जीव घेतला. या प्रकरणात आता पोलिसांनी खुनाबरोबरच लैंगिक अत्याचाराचीही कलमे जोडून गुन्हा दाखल केला आहे.

ही मुलगी सलीमची स्वतःची नसून, त्याने घरोबा केलेल्या एका महिलेची मुलगी आहे. सदर महिला पूर्वी आपल्या पतीसह राहत होती, परंतु त्याच्याशी संबंध तोडून ती आपल्या दोन मुलांसह सलीमसोबत राहायला आली होती. सलीमने सुरुवातीला या मुलांना आपलीच मुलं मानून वाढवण्याचं आश्वासन दिलं होतं.

मात्र याआधीही त्याने दोन्ही अल्पवयीन मुलांना मारहाण केल्याचे प्रकार घडले होते, अशी माहिती 'बायलांचो एकवोट' संस्थेच्या अध्यक्षा आवदा व्हिएगस यांनी दिली. पीडित मुलीची आई कपडे धुण्यासाठी घराबाहेर असताना हा घृणास्पद प्रकार घडला.

या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षकांची विशेष टीम करत असून, सलीम डम्बलवर कडक शिक्षा व्हावी, अशी मागणी सामाजिक संघटनांनी केली आहे.