मुंबई : भारतीय संघाचा आधारस्तंभ आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील धावांचा धडाका लावणारा महान फलंदाज विराट कोहली याने अखेर कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. 'जगात भारी' मानल्या जाणाऱ्या या क्रिकेटवीराने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपल्या कसोटी कारकिर्दीला विराम दिल्याची माहिती दिली.

काही दिवसांपूर्वीच कोहलीने आपला निवृत्तीचा निर्णय बीसीसीआयला कळवला होता. बीसीसीआयने त्याला पुन्हा विचार करण्याची विनंती केली होती, मात्र कोहली आपल्या निर्णयावर ठाम राहिला.

आपल्या १४ वर्षांच्या कसोटी कारकिर्दीत विराट कोहलीने ३० शतके, ३१ अर्धशतके आणि ७ द्विशतके झळकावण्याचा अद्वितीय रेकॉर्ड केला आहे. आक्रमक नेतृत्व, सुसंगत कामगिरी आणि क्रीडाशिस्तीमुळे कोहलीने भारतीय क्रिकेटला नवे उंचीवर नेले.

भारतीय क्रिकेटमधील एका युगाचा समारोप करत विराटने आपल्या पोस्टमध्ये चाहत्यांचे, संघातील सहकाऱ्यांचे आणि प्रशिक्षकांचे आभार मानले आहेत. कसोटी क्रिकेटमधून कोहलीच्या निवृत्तीने क्रिकेटप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.