पर्वरी : येथील जीसीए मैदानावर झालेल्या अंडर-१६ दिवंगत श्री. दिलीप सरदेसाई करंडक – ऑल गोवा स्टेट फायनल २०२४-२५ क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रोग्रेस हायस्कूल, साखळीने जबरदस्त कामगिरी करत न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूटवर मात करत विजेतेपदावर आपले नाव कोरले.
प्रथम फलंदाजी करत प्रोग्रेस हायस्कूलने ४० षटकांत ९ बाद १७२ धावा केल्या. प्रद्युम्न आतपडकरने ६५ चेंडूत ६१ धावांची दमदार खेळी केली, तर अमीश गावसने २३ चेंडूत २७ धावांची उपयुक्त खेळी केली.
प्रत्युत्तरात न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूटचा डाव ३४.१ षटकांत ११७ धावांत आटोपला. त्यांच्याकडून समनीत राऊतने ३० आणि शुदित गुरवने २० धावा केल्या. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही.
उत्कृष्ट प्रदर्शनाच्या जोरावर प्रद्यु्म्न आटपडकरयाने 'सामनावीर', 'सर्वोत्कृष्ट गोलंदाज' आणि 'सिरीजचा उत्कृष्ट खेळाडू' अशी तिहेरी पारितोषिके पटकावली.
विजेत्या संघाचा गौरव जीसीएचे संयुक्त सचिव श्री. रुपेश नाईक, तिसवाडी समन्वयक श्री. जितेंद्र शाह आणि उत्तर गोवा समन्वयक श्री. सुशांत नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
जीसीएचे सचिव श्री. शांबा नाईक देसाई यांनी दोन्ही संघांचे अभिनंदन करत युवा खेळाडूंना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
ही स्पर्धा गोव्यातील उदयोन्मुख क्रिकेटपटूंना व्यासपीठ मिळवून देणारी ठरत असल्याचे आयोजकांनी सांगितले.