मुंबई : इंग्लंडमध्ये जून-जुलै २०२५ मध्ये होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय पुरुष कसोटी संघ जाहीर करण्यात आला आहे. युवा फलंदाज शुभमन गिल याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली असून, दुखापतीनंतर पुनरागमन करणाऱ्या ऋषभ पंतला उपकर्णधार आणि यष्टीरक्षक म्हणून निवडण्यात आले आहे.
या संघात काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. आंध्रप्रदेशचा अष्टपैलू नितीश रेड्डी, तसंच तगड्या फॉर्ममध्ये असलेले साई सुदर्शन आणि अनुभवी करुण नायर यांची निवड चर्चेचा विषय ठरत आहे. दिग्गज जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह संघात पुनरागमन करत असून, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग आणि प्रसिद्ध कृष्णा हे वेगवान माऱ्याचे मुख्य शस्त्र राहतील. फिरकी विभागात कुलदीप यादव व रविंद्र जडेजा यांच्यावर जबाबदारी असेल.