MLA Arrest In Bribe Case || राजस्थान : येथील बागीदौरा मतदारसंघातून निवडून आलेले भारतीय आदिवासी पार्टीचे आमदार जयकृष्ण पटेल यांना भ्रष्टाचारप्रकरणी अटक करण्यात आली आहे. खाण व्यवसायाशी संबंधित प्रश्न विधानसभेत उपस्थित करून, ते मागे घेण्यासाठी तब्बल १० कोटी रुपयांची मागणी त्यांनी केली होती, असा गंभीर आरोप आहे.

राज्याच्या भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने (ACB) दिलेल्या माहितीनुसार, जयकृष्ण पटेल यांनी खाण व्यावसायिक रविंद्र सिंह यांच्याकडे प्रथम १० कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर चर्चा व तडजोडीनंतर ही रक्कम अडीच कोटी रुपयांवर आली. मात्र याच दरम्यान, एसीबीकडे रविंद्र सिंह यांनी ४ एप्रिल रोजी तक्रार दाखल केली होती.

एसीबीने सापळा रचत २० लाख रुपयांची पहिली रक्कम स्वीकारताना आमदार पटेल यांना रंगेहाथ अटक केली. एसीबीचे महासंचालक डॉ. रवि प्रकाश मेहरडा यांनी सांगितले की, "हे प्रकरण अत्यंत गंभीर असून लोकप्रतिनिधी पदाचा गैरवापर केल्याचा प्रकार आहे. आम्ही सखोल चौकशी करत आहोत."

या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून, जनतेमध्ये संतापाची लाट आहे. भारतीय आदिवासी पार्टीने अद्याप या प्रकरणावर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.