पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे पार पडलेल्या नीती आयोगाच्या १०व्या संचालन परिषदेच्या बैठकीस उपस्थिती लावली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत ‘विकसित भारत @2047’ या दृष्टीकोनावर आधारित ‘विकसित राज्य’ या संकल्पनेवर सखोल चर्चा करण्यात आली.

या बैठकीत देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक धोरणे, योजना व रचना यांचा आढावा घेण्यात आला. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले की, पंतप्रधानांकडून मिळालेले मार्गदर्शन हे अत्यंत अमूल्य असून, देशाच्या भावी प्रगतीसाठी दिशा दाखवणारे ठरेल.

“गोवा राज्य ‘टीम इंडिया’चा एक घटक म्हणून, विकसित भारताच्या या सामूहिक प्रवासात आपले सर्वोच्च योगदान देण्यास कटिबद्ध आहे,” असे डॉ. सावंत यांनी सांगितले. त्यांनी हेही नमूद केले की, गोव्याच्या विकासाच्या विविध योजनांचा या राष्ट्रीय दृष्टीकोनाशी समन्वय साधत अंमलबजावणी करण्यात येईल.

बैठकीत विविध राज्यांचे मुख्यमंत्री व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारांमध्ये समन्वयाने काम करत विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यावर भर देण्यात आला.