पणजी – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंत्रालयात घेतलेल्या आढावा बैठकीत आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने राज्यभरातील ३०,००० ठिकाणी योगाभ्यास कार्यक्रम राबवण्याचे लक्ष्य ठरवण्यात आले आहे. या बैठकीला विविध विभागांचे सचिव व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले की, योग दिनापूर्वी नागरिकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी ऑनलाईन योग प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत. तसेच प्रत्येक शाळेत दररोज किमान अर्धा तास योगाभ्यास व त्याच्या प्रचारासाठी राखीव ठेवावा, असे निर्देश त्यांनी दिले.
“योग ही भारताची अमूल्य देणगी आहे. आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा अंगीकार करण्यासाठी योग आवश्यक आहे. गोवा राज्यात योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात यावा, यासाठी प्रशासनाने तयारीत कसूर करता कामा नये,” असे मुख्यमंत्री म्हणाले.
या कार्यक्रमासाठी शाळा, महाविद्यालये, शासकीय व निमशासकीय संस्था, ग्रामपंचायती, नगरपालिका, खासगी संघटना यांचा सहभाग सुनिश्चित करण्यात येणार आहे. अधिकाऱ्यांनी तयारी पूर्ण करून वेळेत अहवाल सादर करण्याचेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
राज्य सरकारने योग दिनाच्या निमित्ताने संपूर्ण राज्यात एकात्मिक आयोजन करून संपूर्ण गोवा – योगमय गोवा'ही संकल्पना यशस्वी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.