लंडन (लॉर्ड्स) : क्रिकेटच्या ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर दक्षिण आफ्रिकेने शनिवारी एक नवा इतिहास रचला. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (WTC Final) अंतिम सामन्यात त्यांनी ऑस्ट्रेलियावर ५ गडी राखून विजय मिळवला आणि प्रथमच कसोटी क्रिकेटमध्ये विश्वविजेतेपद मिळवले. हे दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेटच्या कोणत्याही स्वरूपातील पहिलेच विश्वविजेतेपद असून, आयसीसी स्पर्धेत त्यांचा हा २७ वर्षांनंतरचा पहिला किताब आहे. याआधी त्यांनी १९९८ साली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती.

ऑस्ट्रेलियाने दिलेले २८२ धावांचे लक्ष्य दक्षिण आफ्रिकेने चौथ्या दिवशी उपाहारापूर्वीच पार केले. एडेन मार्करामने संयमी आणि सुस्पष्ट फलंदाजी करत शानदार १३६ धावांची खेळी साकारली, तर कर्णधार टेम्बा बावुमाने जबाबदारीने खेळ करत ६६ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले.

या सामन्याच्या आधीच्या घडामोडी पाहता, ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात २१२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा डाव १३८ धावांत आटोपला. त्यामुळे कांगारूंना ७४ धावांची आघाडी मिळाली. मात्र दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाची फलंदाजी कोसळली आणि ते फक्त २१८ धावा करू शकले. परिणामी दक्षिण आफ्रिकेसमोर २८२ धावांचे आव्हान होते, जे त्यांनी सहजतेने पार करत क्रिकेटमधील एक ऐतिहासिक क्षण घडवून आणला.

दक्षिण आफ्रिकेच्या या विजयामुळे संपूर्ण देशात जल्लोषाचे वातावरण आहे. वर्षानुवर्षे ‘चोकर्स’ अशी ओळख असलेल्या संघाने अखेर आपल्या नावावर विश्वविजेतेपदाची मोहोर उमठवली आहे. प्रशिक्षक, खेळाडू आणि समर्थक यांच्यासाठी हा क्षण अतुलनीय ठरला.