साखळी :: येथील रवींद्र भवनमध्ये आयोजित मोफत वैद्यकीय शिबिराला गुरुवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भेट देऊन पाहणी केली. या शिबिरात विविध तज्ञ डॉक्टरांकडून मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन देण्यात येत होते. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
मुख्यमंत्र्यांनी शिबिरातील वैद्यकीय सेवा, तपासणीच्या पद्धती आणि रुग्ण व्यवस्थापन याचा आढावा घेतला. त्यानंतर उपस्थित डॉक्टर, नर्स, आरोग्य सहाय्यक आणि आयोजक कर्मचाऱ्यांशी संवाद साधत त्यांनी त्यांच्या समर्पित सेवेबद्दल मनःपूर्वक आभार मानले.
आरोग्य तपासणी ही वेळोवेळी होणे आवश्यक असून, अशा शिबिरांमुळे सामान्य जनतेला सुलभ, मोफत आणि दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळतात. नागरिकांनी या सेवेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. सावंत यांनी यावेळी केले.
या शिबिरात हृदयविकार, मधुमेह, डोळे, दात, हाडांचे विकार, स्त्रीरोग, बालरोग आदींच्या तपासणीसाठी तज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध होती. तसेच रक्तदाब, शुगर तपासणी, ईसीजी, नेत्र तपासणी, आणि इतर चाचण्या देखील मोफत करण्यात आल्या.