पणजी : गोव्यात पकडलेले ड्रग्ज हे यश मानणे दुर्दैवी आहे," असे मत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर थेट टीका करत त्यांनी म्हंटले आहे की, गोव्याच्या सीमेवरून येणारी सर्वाधिक ड्रग्जची खेप गोव्यात पकडली जाणे हे यश कसे असेल ? 
४३ कोटींच्या अमली पदार्थांवर शंका उपस्थित करत, आलेमाव म्हणाले की, तीव्र स्वरूपाच्या कोकेन व ड्रग्जच्या प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मी विधानसभेत स्पष्टपणे विचारले होते की गोव्याचा 'पाब्लो एस्कोबार' कोण आहे? पण त्याचे उत्तर मिळाले नाही.
ते पुढे म्हणाले, गुजरात व दिल्ली येथे अलीकडेच पकडण्यात आलेल्या ३-४ हजार कोटी रुपयांच्या या अमली पदार्थांशी तुलना करता गोव्यातील कारवाई फिक्या पडतात." त्यांनी पोलिस यंत्रणेवरही गंभीर आरोप करत म्हटले की, "ड्रग्जचे हे जाळे पोलिसांच्या पाठिंब्याशिवाय शक्य नाही. व्यवस्थेचा संपूर्ण बिघाड झाला आहे आणि त्याचा फटका निष्पाप तरुणांना भोगावा लागत आहे.
युरी आलेमाव यांच्या या घणाघाती टीकेमुळे राज्यातील ड्रग्ज विरोधी उपाययोजनांबाबत सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.