पणजी : 

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर वक्फ मालमत्तेतील अनियमिततेचे आरोप करणारे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस राधा मोहन अग्रवाल यांचे विधान निराधार, बेजबाबदार आणि खोटेपणावर आधारित असल्याचा काँग्रेस पक्षाने तीव्र शब्दांत निषेध केला आहे.

काँग्रेसने म्हटले की, हे आरोप केवळ खरगे यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न नसून, भारतातील एक बलाढ्य दलित नेता म्हणून त्यांचा वाढता प्रभाव भाजपसाठी अस्वस्थ करणारा ठरत आहे.

खरगे यांची ५ दशकांहून अधिक काळची निष्कलंक राजकीय कारकीर्द, त्यांच्या सचोटीचा इतिहास आणि संविधानप्रती असलेली निष्ठा याला कोणतीही किंमत लावता येत नाही, असे काँग्रेसने स्पष्ट केले.

काँग्रेसने भाजपला खरगे यांच्याविरोधातील आरोपांचे कोणतेही वस्तुनिष्ठ पुरावे सादर करण्याचे आव्हान दिले आहे. तसेच, जर भाजप हे पुरावे सादर करण्यात अपयशी ठरली, तर त्यांनी देशाची आणि श्री खरगे यांची बिनशर्त माफी मागावी, अशी मागणी केली.

काँग्रेसने म्हटले की, महागाई, बेरोजगारी आणि भांडवलशाहीच्या विळख्यात सापडलेल्या देशापासून जनतेचे लक्ष हटवण्यासाठी भाजप खोट्या आरोपांचा आधार घेत आहे.

पक्षाने पुन्हा एकदा स्पष्ट केले की, सामाजिक न्याय, संविधानिक मूल्ये आणि भाजपच्या हुकूमशाहीविरोधात निर्भयपणे उभे राहणाऱ्या खरगे यांच्या मागे संपूर्ण काँग्रेस पक्ष ठामपणे उभा आहे.