पणजी : गोवा फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (GFDC) तर्फे आयोजित काजू फेस्त २०२५ – सिझन 3 या उपक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते डी. बी. मैदान, कंपाल येथे करण्यात आले. इतर औपचारिक उद्घाटनांपेक्षा वेगळ्या पद्धतीने, मुख्यमंत्र्यांनी काजूच्या रोपट्यांना पाणी घालून या कार्यक्रमाचे प्रतीकात्मक आणि पर्यावरणपूरक उद्घाटन केले.
या उद्घाटन समारंभास वनमंत्री श्री. विश्वजित राणे, पर्यटन मंत्री श्री. रोहन खंवटे GFDCच्या अध्यक्षा डॉ. देवीया राणे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये प्रमेंद्र विष्णू शेट प्रविण आर्लेकर डॉ. गणेश गायकवाडउल्हास तुयेणकर आदी विविध मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, “गोव्याचा काजू हा केवळ उत्पादन नव्हे, तर गोव्याच्या सांस्कृतिक, कृषी आणि पर्यटन वारशाचा अविभाज्य भाग आहे. अशा उपक्रमांमुळे स्थानिक शेतकरी, प्रक्रिया उद्योग आणि पर्यटन क्षेत्राला एक नवे व्यासपीठ मिळते.”
वनमंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले की, **काजूचे उत्पादन आणि त्यासंबंधित प्रक्रिया उद्योगाला राज्य सरकार अधिक चालना देणार असून GFDC च्या माध्यमातून अधिक योजनांची अंमलबजावणी करण्यात येईल.
‘काजू फेस्ट’मध्ये गोव्यातील स्थानिक काजू उत्पादक, शेतकरी, उद्योजक यांना त्यांच्या उत्पादनांचे प्रदर्शन करण्याची संधी मिळाली. याशिवाय काजूवर आधारित विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्थानिक कलाकारांच्या सादरीकरणाने कार्यक्रम अधिक रंगतदार झाला.
या उपक्रमामुळे गोव्यातील जैवविविधता, पर्यावरण, स्थानिक उद्योग आणि पारंपरिक शेती यांचा समतोल साधण्याचा शासनाचा प्रयत्न अधोरेखित झाला, अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाला गोमंतकीय नागरिकांचीही मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली आणि सर्वत्र एक सकारात्मक, उत्साही वातावरण निर्माण झाले.