पणजी : शिरगाव येथे पार पडलेल्या श्री देवी लईराई यात्रेदरम्यान झालेल्या दुर्दैवी चेंगराचेंगरीत प्राण गमावलेल्या  तनुजा कवठणकर यांच्या परिवाराची  राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी आचुतवाडो, थिवी येथे भेट घेऊन सांत्वन केले. या दुर्घटनेमुळे कवठणकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून राज्यपालांनी त्यांच्या दुःखात सहभागी होत त्यांना धीर दिला.

यावेळी राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री नीलकंठ हळर्णकर देखील उपस्थित होते. त्यांनीही कुटुंबीयांची विचारपूस करत आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले.

श्री देवी लईराई यात्रा ही गोव्यातील एक प्रमुख धार्मिक यात्रा असून हजारो भाविक दरवर्षी मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी होतात. यंदा यात्रेदरम्यान चेंगराचेंगरी झाल्याने ही घटना अत्यंत हृदयद्रावक ठरली. प्रशासनाने याप्रकरणी चौकशी सुरू केली असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

राज्यपाल पिल्लई यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त करत शासनामार्फत पीडित कुटुंबांना सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे.